12/03/2026
*गॅस टंचाई आणि स्वयंपकाचे नवे मार्ग* 🔥🍲
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत थोडी अनिश्चितता निर्माण झालेली दिसते. काही ठिकाणी घरगुती वापराचे गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यासारख्या हॉटेल व केटरिंग व्यवसायावर दिसू लागला आहे. आम्ही काम करत असलेल्या परिसरातही एक मेस आज गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे पूर्ण दिवस बंद राहिली. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी 🎓 आणि बाहेरगावाहून नोकरीसाठी आलेले लोक रोज जेवायला येतात. मेस बंद राहिली म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या स्टाफसमोरही बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो 👨🍳 आणि जे लोक रोज तिथे जेवायला येतात त्यांनाही अचानक अडचण निर्माण झाली. ही फक्त एका मेसची गोष्ट नाही, तर अशा परिस्थितीचा परिणाम अनेक छोट्या व्यवसायांवर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर होऊ शकतो.
ही परिस्थिती किती दिवस राहणार आहे, गॅस कधी येणार आहे, कितपत मिळणार आहे याबाबत अजून स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे काही ठिकाणी थोडे भीतीचे वातावरणही दिसते. पण अशा वेळी घाबरण्यापेक्षा थोडा वेगळा विचार करणे जास्त उपयोगाचे ठरते. अडचण आली की माणूस नवीन मार्ग शोधतो आणि तिथूनच अनेक कल्पना जन्माला येतात. 💡
आज आम्ही पार्टनर्सनी याच विषयावर बसून चर्चा केली. आमच्याकडे गॅस शेगड्या सोडून इलेक्ट्रिक फायर, इलेक्ट्रिक स्टीमर, फ्रीज, मिक्सर आणि चहा-कॉफी मशीन अशी साधने आहेत. त्यांचा उपयोग करून काही पदार्थ तयार करता येतील का याचा विचार केला. त्यातून असे लक्षात आले की गॅस कमी वापरून किंवा अजिबात न वापरता देखील अनेक पदार्थ करता येऊ शकतात. उदाहरणार्थ स्टीमरमध्ये व्हेज-नॉनव्हेज मोमोज 🥟, उकडीचे मोदक, स्टीम कोथिंबीर वडी, ढोकळा, राईस इडली किंवा रवा इडली सोबत मिक्सरवर बनवलेली नारळ अथवा शेंगदाणा चटणी, स्टीम्ड कॉर्न 🌽 आणि स्टीम्ड मिक्स भाज्या, मॅगी, नूडल्स किंवा पास्ता 🍜 करता येतात. इलेक्ट्रिक फ्रायरवर वडा, साबूवडा, पॅटिस, कटलेट करता येतात. त्याशिवाय दडपे पोहे, चहा-कॉफी ☕, बॉइल्ड एग्ज 🥚, बॉइल्ड चिकन, व्हेज सँडविच 🥪, एग सँडविच, दहिवडी, दही-पुरी असे पदार्थही करता येऊ शकतात. पेयांमध्ये ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत 🥤 असे पर्याय देता येतात. अशा प्रकारे थोडा विचार बदलला तर मर्यादित साधनांमधूनही ग्राहकांना अन्न देणे शक्य आहे.
गंमत म्हणजे आज एका रीलमध्ये पाहिले की साध्या पाणी गरम करण्याच्या कॉइलचा वापर करून कोणीतरी गरमागरम मटण रस्सा बनवत होते आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये इस्त्रीवर छोटी चपाती बनवताना दाखवले होते. रोजच्या स्वयंपाकासाठी हे योग्य आहे असे नाही, पण अडचण आली की माणूस किती वेगवेगळे उपाय शोधू शकतो याचे ते एक उदाहरण आहे. 😄 थोडक्यात सांगायचे तर मार्ग नेहमी असतो, फक्त थोडा विचार बदलण्याची गरज असते. इंडक्शन कूकटॉप, इलेक्ट्रिक स्टीमर, इलेक्ट्रिक राईस कुकर आणि आपली लाडकी चूल 🔥 असे पर्याय आपण वापरू शकतो.
हॉटेल व्यवसायिकांनीही घाबरून न जाता पर्याय शोधले तर परिस्थिती हाताळता येऊ शकते. ग्राहकांनीही या काळात थोडे सहकार्य केले तर ही अडचण सहज पार होऊ शकते. कारण हॉटेल, मेस आणि केटरिंग व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून अनेक लोकांच्या रोजगाराशी आणि रोजच्या अन्नाशी जोडलेला असतो. 🤝
गृहिणींच्यासाठी देखील ही गोष्ट उपयोगाची ठरू शकते. गॅस नसताना देखील काही साधे पदार्थ सहज बनवता येतात. उदाहरणार्थ दडपे पोहे, दही पोहे, वेज सॅलड 🥗, स्प्राउट सॅलड, फ्रूट सॅलड 🍎, भेळ, ड्राय भेळ, शेंगदाणा-काकडी चाट, उकडलेल्या कडधान्यांचे सॅलड, सँडविच, जॅम सँडविच, पीनट बटर सँडविच, दही काकडी, दही पुरी, मिक्स फ्रूट प्लेट, पपई किंवा केळीची प्लेट, ताक, लस्सी, कोकम सरबत, लिंबू सरबत, केळी शेक, मँगो शेक 🥭, कोल्ड कॉफी असे अनेक पर्याय सहज करता येतात.
जर तुमच्या डोक्यात गॅसशिवाय बनवता येतील असे अजून काही सोपे पदार्थ किंवा उपाय असतील तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा. 💬 तुमच्या कल्पना इतरांनाही उपयोगी पडू शकतात. कधी कधी अशा छोट्या कल्पनांमधून मोठे उपाय सापडतात.
या निमित्ताने प्रशासनालाही सहकार्य करण्याची आपली भूमिका असली पाहिजे. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन, पुरवठा व्यवस्था, व्यापारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. संयम, समजूतदारपणा आणि सहकार्य या तीन गोष्टी या काळात खूप महत्त्वाच्या आहेत. 🙏
अडचणी या कायमच्या नसतात. त्या आपल्याला थोडा वेगळा विचार करायला भाग पाडतात. थोडी कल्पकता, थोडे धैर्य आणि एकमेकांचे सहकार्य असेल तर कोणतीही परिस्थिती आपण पार करू शकतो.
१२ मार्च २०२६
*सागर विलास बकरे, कोल्हापूर*
संचालक – सतसात्विक फूड्स प्रा. लि.
BTB क्लाउड किचन व केटरिंग सर्विसेस 🍽️
हॉटेल खा-तरी, दसरा चौक, कोल्हापूर 📍