21/03/2025
कोंकणची खाद्यसंस्कृती
पंचवीस तीस वर्षापूर्वी मालवणी जेवणात न्याहारीत ठरलेले पदार्थ असत. सकाळी गुळ घातलेला कोरा चहा . एखाद्याच्या गोठ्यात गाई म्हैशी दुभत्या असतील तर दुधाचा चहा . न्याहारीला पेज , वालीची , फणसाची भाजी . ओल्या खोबऱ्याचे तेल मीठ मसाला घातलेले चून , तांदुळ किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर कुळथाची पीटी , उडदाचे डांगर, कांदा घातलेला सुका गोलमा , कधीतरी कवटाची पोळी ( ॲामलेट) . जेवणात भातासोबत सणवार सोडले तर डाळ किंवा वरण क्वचीत असे . वाल, चवळी, कुळीथ , मुग, उडीद या कडधान्यांना मोड काढून त्याची आमटी ( निस्त्याक) बनविले जाई.
पावसाळयात कार्ली , दोडकी, भोपळा, भेंडी, तोंडली ,पडवळ, गवार , रानभाज्या, पालेभाज्या शेवग्याची भाजी , शेंगा विपुल प्रमाणात मिळतात. अळंबी , अळू, तेरे असतेचं .
मांसाहारात कोंबडी वडे, मासे , कालवं , खेकडे , सुकटं ( सुके मासे ) , माशाचे तिखले, माशाचे सुके , तिसऱ्या ( शिंपल्या) , खुबे , चिंगळा ( कोलंबी) यांचा समावेश असतो
एप्रिल, मे मध्ये फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ , कैरीची चटणी , कैरीचे खिरमट , सोलकडी, आंब्याचे रायते केले जाते.
घावने, आंबोळ्या, रस शेवया, खरवस, काकडीचे धोंडस , भोपळ्याचे , चिबूडाचे वडे , सोजी, भिरडी, मालपुवा, तांदळाची गुळ ओलं खोबरं घालून केलेली खीर, मोदक, नेवऱ्या , पातोळ्या, हे सणावाराला पक्वान्न म्हणुन केले जातात .
नारळाच्या वड्या ( खोबऱ्याची काप) , चण्याच्या पीठाचे तीळ शेंगदाणे सुके खोबरं घालून केलेले लाडू, शेंगदाण्याचे लाडू , शेवाचे लाडू ( खडखडे लाडू) . मालवणी खाजा, लाल पोहे , पीठाच्या करंज्या, भाजलेले काजू गर , आंब्या फणसाच्या पोळ्या (साटं) हे चाकरमान्यांना भेट म्हणुन दिले जातात.
#इंदवटी
#राजापूर #कोकण #दापोली #दापोली #कोकणीमेजवानी