13/08/2026
प्रसिद्धीपत्रक
FoSTaC प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचला 100 हून अधिक जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, दि. 13 ऑगस्ट 2026 :
अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि सुरक्षित अन्न हाताळणीबाबत केटरिंग व हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशन आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (MCED) मार्फत आयोजित करण्यात आलेल्या FoSTaC – Basic Catering Training च्या दुसऱ्या बॅचला 100 हून अधिक सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विवेक शिंदे आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष श्री. सचिन शानबाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. योगेश सावंत व सेक्रेटरी श्री. उदय भोसले, आणि कोर्स समन्वयक श्री रोहन काटे तसेच महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक श्री. महावीर सनके, FoSTaC प्रशिक्षक डॉ. रामेश्वर जाजू, तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे श्री. संतोष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी मांगल्य मल्टीपर्पज हॉलचे मालक श्री. राहुल चौधरी व श्री. प्रथमेश लगारे यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी सुशांत पै, ओंकार शुल्क, रोहन दुधाने, अमर पाटील, अशोक काळे आणि रमेश राज रायगर यांनीही मोलाचे सहकार्य केले.
महिला सभासदांच्या हस्ते अन्नपूर्णा प्रतिमा पूजन
मांगल्य मल्टीपर्पज हॉल, ताराबाई पार्क येथे झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात माता अन्नपूर्णा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विशेष म्हणजे अन्नपूर्णा प्रतिमेचे पूजन कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशनच्या महिला सभासदांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
अन्नसुरक्षेबाबत मार्गदर्शन
FoSTaC म्हणजे Food Safety Training & Certification. अन्न व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अन्नसुरक्षा, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, स्वच्छता व निर्जंतुकीकरण, अन्न साठवणूक, क्रॉस-कंटॅमिनेशन तसेच Food Safety Compliance याबाबत शास्त्रीय आणि व्यावहारिक माहिती मिळावी, या उद्देशाने प्रशिक्षण घेण्यात आले.
FoSTaC प्रशिक्षक डॉ. रामेश्वर जाजू यांनी प्रशिक्षणादरम्यान अन्नसुरक्षेशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.